तिहेरी अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ प्रवासी जखमी झाल्याचे समजते.
Buldhana Accident: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर तीन वाहनांची धडक होऊन पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून इतर २४ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ७ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती असून सध्या त्यांच्यावर खामगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. एसटी बस, खासगी प्रवासी बस आणि बोलेरे या वाहनांची धडक होऊन हा तिहेरी अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेगावकडून कोल्हापूरकडे जात असलेली बोलेरो कार पुण्याकडून परतवाड्याकडे जात असलेल्या एसटी बसला धडकली. शेगाव-खामगाव या महामार्गावर झालेल्या सदर अपघातावेळी पाठीमागून येणाऱ्या खासगी बसच्या चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि खासगी बसनेही बोलेरो कारला धडक दिली. या तिहेरी अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २४ प्रवासी जखमी झाल्याचे समजते.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने खामगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
वाहने चक्काचूर भरधाव वाहने एकमेकांना धडकून झालेल्या या अपघातात बोलेरो कारचा अक्षरश: चुराडा झाला असून एसटी महामंडळाच्या बससह खासगी बसचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पोलिसांनी सदर अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.